भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे! प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्याची पूर्तता करण्यापासून सरकार अंगकाढू भूमिका घेत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निक्रियतेमुळे मेटकुटीला आला आहे. त्यामुळे भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून, पोटावर पाय देणारे सरकार आहे, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी, विविध मागण्यांसाठी, महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरवर भव्य संग्राम मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी, नागरिक बंधू-भगिनी सामील झाले होते.

खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, ‘‘सोलापूर जिह्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले; परंतु भरपाई मिळाली नाही. याचा जाहीर निषेध करीत शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ कमी करावी, शेतीसाठी 24 तास वीजपुरवठा द्या, शेती अवजारे, खत व औषधे यावरील जीएसटी रद्द करा, पीएम किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. यावेळी आपण कायम शेतकऱ्यांसोबत राहून त्यांच्या हक्कांसाठी लढत राहणार, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी दिला.

या मोर्चामध्ये माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दिलीपराव माने, कॉ. नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, अॅड. नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, धर्मराज काडादी, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादीचे सुधीर खरटमल यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते.