नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार असून मुंबईची ग्रामदेवी असलेल्या श्री मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कालावधीत मंदिर रोज पहाटे 5.30 वाजता उघडून रात्री 10.30 वाजता बंद केले जाणार आहे.
श्री मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे या वर्षी देखील शारदीय नवरात्रौत्सव 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी मंदिर पहाटे 5.30 वाजता मंगला आरती करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले जाईल. याच दिवशी सकाळी 7 आणि 7.49 या वेळेत मंदिर विश्वस्तांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाईल. यानंतर 25 पुजाऱ्यांकडून चंडीपाठ पठण केले जाईल. 7 ऑक्टोबरला पंचमीच्या मुहूर्तावर सायंकाळी 6 वाजता मंदिरात दीपोत्सवाचे तर 12 ऑक्टोबरला नवमीच्या दिवशी विश्वकल्याणासाठी श्री चंडी महायज्ञाचे आयोजन केले आहे. या यज्ञाचा प्रारंभ पहाटे 4 वाजता होऊन पूर्णाहुती सकाळी 10 आणि 10.30 या दरम्यान होणार आहे. याच दिवशी सकाळी 11 वाजल्यानंतर दसरा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी मंदिरात सहा वेळा आरती होईल. श्री मुंबादेवी माता ही मुंबई शहराची ग्रामदेवी आहे, म्हणून या उत्सव काळात भक्तांनी मोठय़ा संख्येने मंदिरात दर्शनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबादेवी मंदिर प्रशासनाने केले आहे.
सुरक्षेसाठी 40 सीसीटीव्ही
सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बॅग स्पॅनर बसविला आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुंबादेवी भक्त मंडळाचे अनेक स्वयंसेवक सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. लोकमान्य टिळक पोलीस ठाणे यांचा मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका सी विभागाचे कर्मचारीदेखील मंदिर परिसरात सापसफाई करण्यात व्यस्त झाले आहेत.
भक्तांसाठी थंडगार पाणी, सरबत
सध्या शहरात सुरू असलेला पावसाचा जोर आणि ऑक्टोबरमधील प्रचंड ऊन असण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने मंदिराबाहेर दोन मोठे मंडप भक्तांच्या सोयीसाठी उभारले आहेत. मंदिर परिसरात थंडगार आणि शुद्ध पाणी व सरबत वाटप असणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांनी मोठे सामान किंवा बॅगासोबत आणू नये, जेणेकरून त्याचा इतर भक्तांना त्रास होणार नाही, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले.