लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या कारवाईसंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला मध्ये न पडण्याचा इशारा दिला होता. परंतु, इराणने त्याकडे दुर्लक्ष करत मंगळवारी रात्री तब्बल 400 क्षेपणास्त्रे डागली. तसेच इस्रायलच्या जाफा येथे गोळीबारीच्याही घटना घडल्या. या घटनेत 3 जण मारले गेले.
इराणच्या हल्ल्यानंतर जवळपास 10 लाख लोकांनी बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घेतला याआधी हुती बंडखोरांनीही इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता पेटला असून मध्य पूर्वेत आता युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
इराणच्या हल्ल्यापूर्वी इस्रायली रणगाडे 18 वर्षांनी लेबनॉनमध्ये घुसले. सैनिकी पथकांनी छोटे पण विध्वंसक हल्ले सुरू केले. लेबनॉन आणि इस्रायल यांच्या सीमाभागातील प्रदेश इस्रायलने बंदीस्त प्रदेश म्हणून जाहीर केला आहे.
सीमा भागातील गावांवर हल्ले
इस्रायली सैन्याचे रणगाडेही लेबनॉन सीमेवरून आत घुसले आहेत. सैनिकांची छोटी पथके सोमवार रात्रीपासूनच सीमा भागातील हिजबुल्लाची ठाणी आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी मर्यादित स्वरुपाचे हल्ले करत आहेत. सीमेजवळील गावांमधून हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायलवर हल्ला करत असतात. यामुळे या गावांमधील हिजबुल्लाच्या सुविधांना नष्ट करण्यात येत आहे, असे सैन्याने सांगितले.
हवाई दलाची मदत
गोपनीय माहितीच्या आधारे हे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इस्त्रायली हवाई दल त्यांना मदत करत आहे. या हल्ल्याच्या नियोजनाची माहिती इस्रायलने अमेरिकेला आधीच दिली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हस्तकांशी लढा देताना इस्रायलला ‘‘मोठ्या आव्हानाचा’’ सामना करावा लागत आहे, असे व्हिडिओ निवेदन मंगळवारी प्रसृत केले. इस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकेची जहाजे आणि विमाने आधीच या प्रदेशात तैनात आहेत. आणखीही सैन्य, शस्त्रमदत अमेरिकेने रवाना केली आहे.