स्वत:च्या मुलीचे लग्न लावले; इतरांच्या मुलींना संन्यासी राहायला का सांगता?; मद्रास हायकोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल

स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिले, मग इतरांच्या मुलींना मुंडण करण्यासाठी, वैवाहिक जीवनाचा त्याग करून संन्यासी राहायला का सांगता? त्यासाठी प्रोत्साहित का करता, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, सद्गुरू जग्गी वासुदेव यांना केला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कोईम्बतूर येथील ईशा फाऊंडेशनच्या आश्रमाची झाडाझडती घेतली.

कोईम्बतूर येथील तामीळनाडू कृषी विद्यापीठातील निवृत्त प्रोफेसर एस. कामराज यांनी ईशा फाऊंडेशनविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या दोन उच्चशिक्षित मुली गीता कामराज ऊर्फ मां माथी (42) आणि लता कामराज ऊर्फ मा मांथू यांना ईशा फाऊंडेशनमध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी मजबूर केले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला.

न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती व्ही. शिवगणनम यांच्या खंडपीठाने तामीळनाडू पोलिसांना याप्रकरणी तपासणी करून ईशा फाऊंडेशनशी संबंधित माहिती सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालयात स्पष्ट मत मांडताना जग्गी वासुदेव यांना खडा सवाल केला. ‘तुम्ही स्वतःच्या मुलींचे लग्न लावून दिले, मग इतरांच्या मुलींना वैवाहिक जीवनाचा त्याग करून संन्यासी राहायला का सांगता? संन्यासी बनण्यासाठी प्रोत्साहित का करता, असे न्यायालयाने विचारले.