भाजपची हुकूमशाही… दिल्लीच्या सीमेवर सोनम वांगचुक यांना अटक

लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीत धडक देऊन केंद्रातील भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी पदयात्रा काढणाऱया लडाखवासीयांचा आवाज दाबण्यात आला. शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि आंदोलकांना हुकुमशाही पद्धतीने बेडय़ा ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या सीमेवर पदयात्रा रोखत वांगचुक तब्बल 150 जणांना अटक करण्यात आली. आज लडाखच्या खासदारांनाही ताब्यात घेतले. या सर्वांना दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

वांगचुक यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले असून एनडीए सरकारवर टीकेची झोड उठली आहे वांगचुक हे राजघाटावर जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राजघाटासह दिल्लीतील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आंदोलकांमध्ये लडाखचे खासदार हाजी हनीफा यांचाही समावेश आहे. आज दिल्ली आणि हरयाणादरम्यान सिंधू बॉर्डवर आंदोलक पोहोचले. त्यावेळी त्यांना तिथेच रोखून पोलिसांनी ताब्यात घेतले. लडाखमधील पर्यावरणीय समस्यांसह विविध मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे वांगचुक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दिल्लीत येण्यापासून कुणालाही रोखता येणार नाही

वांगचुक यांच्या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्ली सर्वांची असून येथे येण्यापासून कुणाही भारतीयाला रोखता येणार नाही असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या दिशेने येणाऱया शेतकऱ्यांना तर कधी लडाखमधील लोकांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. या शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱया लोकांची सरकारला भीती का वाटत आहे? असा सवाल केजरीवाल यांनी केला.

मेधा पाटकर करणार उपोषण आंदोलन

वांगचुक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या उद्या गांधी जयंतीदिनी राजघाटावर उपोषण आंदोलन करणार आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 असे उपोषण आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात आपल्या समर्थकांनीही सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. लडाखमधील जनतेच्या मान्यतेशिवाय त्यांच्यावर निर्णय लादले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

सर्व अधिकार दिल्लीच्या एलजींना – अतिशी

ही भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आहे. सोनम वांगचुक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. लडाखमध्ये आणि दिल्लीत एलजी राजवट संपली पाहिजेत. परंतु, लोकांचे सर्व अधिकार काढून एलजींना दिले आहेत. आताही मला पूर्ण विश्वास आहे की, या पोलीस अधिकाऱयांना एलजी साहेबांचा फोन आला असेल आणि निवडून आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही सोनम वांगचुक यांना भेटू देऊ नका, असे आदेश आले असतील. त्यामुळे मला आणि केजरीवाल यांना सोनम वांगचुक यांची भेट घेऊ दिली नाही. असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी मोदी सरकारवर केला.

मोदींचा अहंकार तुटेल राहुल गांधी संतापले

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱया वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱयांना अटक करणे स्वीकारार्ह नाही. लडाखच्या भविष्यासाठी आंदोलन करणाऱयांना दिल्लीच्या सीमेवर अटक का करण्यात आली, असा सवाल करतानाच तुम्हाला लडाखचा आवाज ऐकावाच लागेल. मोदींनी तयार केलेले चक्रव्यूह आणि अहंकार दोन्ही तुटेल, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मला दिल्लीच्या सीमेवर ताब्यात घेतले. हजारांवर पोलीस होते. माझ्यासोबत वयोवृद्ध आहेत. त्यांनाही डांबले. पुढे काय घडेल माहीत नाही, पण शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहील. – सोनम वांगचूक