मुंबईत आढळला ‘झिका’चा रुग्ण, डेंग्यू, मलेरियाचाही विळखा

पावसाळा संपत आला तरी पावसाळी आजारांनी मात्र मुंबईत चांगलेच ठाण मांडले असून आता ‘झिका’चा रुग्णही आढळला आहे. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे 1456 तर मलेरियाचे 1261 रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टपेक्षा पावसाळी आजारांच्या रुग्णांची वाढ जास्त असल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत ‘झिका’ची लागण झालेली एक महिला असून सहव्याधींनी ग्रस्त आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आता ‘झिका’ची कोणतीही लक्षणे नसून प्रपृती स्थिर असल्याची माहितीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पालिका असे करतेय काम

पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका सज्ज असून रुग्णांसाठी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष 500 बेडही तैनात आहेत. संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे. शिवाय पालिकेकडून लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

‘झिका’ची लागण एडीस डासाच्या चावण्याने होते. यामध्ये ताप, अंगावर पुरळ, डोळे येणे, सांधेदुखी, थकवा आणि अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने पालिकेच्या पिंवा खासगी रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्प साधा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अशी घ्या काळजी

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, का@लरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिपुनगुनिया असे आजार पसरतात.

हे आजार टाळण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, लक्षणे असल्यास गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा. मास्क वापरावा.

घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्प करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

असे आढळले रुग्ण

डेंग्यू 1456
मलेरिया 1261
चिकुनगुनिया 156
लेप्टोस्पायरोसिस 75
गॅस्ट्रो 466
कावीळ 129
स्वाइन फ्लू 62
झिका 1