IND vs BAN – अडीच दिवसात बांगलादेशचा खुर्दा; कानपूर कसोटी जिंकत मालिकाही हिंदुस्थानच्या खिशात

पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही कानपूर कसोटीत हिंदुस्थानने विजयी झेंडा फडकावला आहे. अवघ्या अडीच दिवसामध्ये हिंदुस्थानने पाहुण्या बांगलादेशला धूळ चालली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने कानपूर कसोटी 7 विकेट्सने जिंकत मालिका 2-0 अशी खिशात घातली. या दमदार विजयानंतर हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे.

बांगलादेशने चौथ्या डावात हिंदुस्थानपुढे 95 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान हिंदुस्थानने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने 45 चेंडूत 51 धावा केल्या, तर ऋषभ पंतने नाबाद 29 धावांची खेळी केली. यशस्वीला सामनावीर तर आर. अश्विनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या डावात बांगलादेशला 233 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानने आपला डाव 285 धावांवर घोषित केला. हिंदुस्थानने 53 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावांमध्ये गारद करत सामना आपल्या बाजुने झुकवला.

आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. आकाशदीपला एक विकेट मिळाली. त्यानंतर मिळालेले आव्हान 17.2 षटकात गाठत सामना आणि मालिकाही जिंकली.