लांडे यांच्यासह पाच नगरसेवक ‘तुतारी’ च्या वाटेवर? अजित पवार गटाचे माजी नगरसेवकही संपर्कात

लोकसभेला शिरूरमधून उमेदवारीसाठी डावलल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पाच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. लांडे आणि पाच माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. तसेच यावेळी माजी नगरसेवकांनी तर ‘साहेब, चिंचवडमधील उमेदवारीसाठी आमच्यापैकी एकाचा विचार व्हावा; अन्यथा तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याचे आम्ही काम करू,’ अशी ग्वाही देऊन टाकली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पिंपरी- चिंचवड शहरातील बहुतांशी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले ते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शरद पवार गटाकडे शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढला आहे.

विधानसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सुमारे 20माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शहरात अजित पवार गटाची अस्वस्थता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी चार माजी नगरसेवकांनी ‘राष्ट्रवादीला चिंचवडची जागा सोडून घ्या; अन्यथा आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही,’ असा इशारा दिला होता. मात्र, पक्षाने योग्य ती दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे या पाचजणांनी भेट घेतली आहे.

दरम्यान, अजित गव्हाणे यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यापासूनच माजी आमदार लांडे हेही ‘तुतारी’ हाती घेणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, लांडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही भेटी घेत आहेत. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम वाढला असतानाच आज पुन्हा ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली आहे. लांडे कोणता निर्णय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीत असलो, तरी आता पर्याय शोधला पाहिजे. किती दिवस शांत राहणार आहे? चार दिवसांपूर्वी आम्ही भूमिका स्पष्ट केली होती; परंतु पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पवारसाहेबांची भेट घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती त्यांना सांगितली. आमचा विचार व्हावा. तुम्ही जो उमेदवार द्याल, तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासह भाजपमधील काही माजी नगरसेवक त्या उमेदवाराचा प्रचार करतील.

– विनोद नढे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस