>> सचिन जगताप
खोल समुद्रात मासेमारी करताना चुकून सागरी हद्द ओलांडल्याने हिंदुस्थानातील 210 मच्छीमारांना पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने अटक केली आणि त्यांना तुरुंगात डांबले. त्यापैकी 130 जणांच्या शिक्षेचा कालावधी संपूनही ते आजतागायत पाकिस्तानच्या कैदेत आहेत. आपल्या मातृभूमीकडे येण्याची या मच्छीमारांना गेल्या अनेक महिन्यांपासून ओढ लागलेली आहे. विशेष म्हणजे कराचीच्या तुरुंगामध्ये असलेल्या 130 हिंदुस्थानी मच्छीमारांमध्ये महाराष्ट्रातील 19 जणांचा समावेश आहे. स्वतःला विश्वगुरू म्हणणारे व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापणारे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात तरी काय, असा एकच सवाल विचारला जात आहे. मोदी यांच्या या दुर्लक्षपणामुळे मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत.
शेजारधर्म म्हणून अनेक पाकिस्तानी मच्छीमार कैद्यांची सुटका हिंदुस्थान सरकारने यापूर्वी केली आहे. पण पाकिस्तान सरकार मात्र शेजारधर्म पाळत नसल्याचे दिसून आले आहे. सध्या 210 हिंदुस्थानी मच्छीमार कराचीमधील मालीर तुरुंगात सजा भोगत आहेत. त्यातील 130 जण तर दोन वर्षांपासून अधिक काळ असून त्यांच्या शिक्षेचा कालावधीदेखील संपला आहे. या मच्छीमारांची सुटका करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करीत नाहीत, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.
दहाजणांची प्रकृती बिघडली
सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या हिंदुस्थानी कैद्यांपैकी 10 मच्छीमारांची प्रकृती बिघडलेली असून त्यांना तातडीच्या उपचाराची गरज आहे. त्यांचे कुटुंबीयदेखील तणावात आहेत. केंद्र सरकारने आपले राजनैतिक कौशल्य पणाला लावून त्वरित मार्ग काढावा व सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई व मच्छीमारांचे नेते वेलजीभाई मसानी यांनी केली आहे.
हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन देशांमध्ये 21 मे 2008 रोजी कॉन्सुलर अॅक्सेस करार झाला. त्यामुळे पाकिस्तान सरकारने 130 मच्छीमारांना सोडणे अपेक्षित होते.
द्विपक्षीय कराराच्या कलम 5 नुसार हे मच्छीमार आजही आपल्या मायदेशी परतण्यासाठी पात्र आहेत. मग पाकिस्तान सरकारवर विश्वगुरू नरेंद्र मोदी दबाव का टाकत नाहीत, असा सवाल शांतताप्रिय कार्यकर्त्यांनी केला आहे.
5 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या तुरुंगातील एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याची शिक्षा 2021 मध्येच संपली होती. परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित दखल घेऊन तुरुंगात खितपत पडलेल्यांची सुटका न केल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.