Badlapur Sexual Assault: उदय कोतवाल, तुषार आपटे फरार घोषित

badlapur sexual assault case

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हे प्रकरण दडपणाऱ्या आदर्श संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापिकेवरही पोक्सो गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरी संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे पोलिसांना सापडलेले नाहीत. भाजपशी संबंधित संस्था असल्याने राज्य सरकार संस्थाचालकांना वाचवत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच उद्या मंगळवारी उच्च न्यायालयात संस्थाचालकांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असल्याने आज एसआयटीने कोतवाल आणि आपटेला फरार घोषित केले.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केलेल्या दिवशीच सहआरोपी कोतवाल आणि आपटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उद्या १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस आणि एसआयटी काम करत असल्याची बाब उद्याच्या सुनावणीत येऊ शकते. त्यामुळेच पोलिसांवरील रोष कमी करण्यासाठीच सुनावणीच्या पूर्वसंध्येला एसआयटीने कोतवाल आणि आपटेला फरार घोषित केल्याची चर्चा बदलापुरात सुरू आहे.

काय आहे प्रकरण

12 आणि 13 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळा आणि पोलिसांकडून पालकांवर दबाव टाकला. चिमुरडींवरील अत्याचाराआधीचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले. राज्य सरकार अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने 20 ऑगस्ट रोजी बदलापूरकरानी 12 तास रेल रोको केला. यानंतर न्यायालयानेही सरकारला धारेवर धरले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना सहआरोपी करून 27 ऑगस्ट रोजी पोक्सो दाखल केला आणि हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग केले. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आजतागायत कोतवाल आणि आपटे पोलिसांना सापडलेले नाहीत.