कालिनात शिवसेनेचा दणदणीत मेळावा, 52 वर्षे जुन्या शाखेला नवी झळाळी

कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार, असा निर्धार आज कलिनावासीयांनी केला. 1972 साली उभारण्यात आलेल्या आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 52 वर्षे जुन्या वाकोला, कदमवाडीतील शाखा क्रमांक 91 चे नूतनीकरण करण्यात आले. त्याचा उद्घाटन समारंभ आज पार पडला. यावेळी या नव्या वास्तूत शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या वतीने शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

नूतनीकरण करण्यात आलेल्या या शाखेच्या वास्तूत एकाच वेळी 200 लोक बसू शकतात. अत्याधुनिक पद्धतीने शाखेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. येथील साऊंड सिस्टीम अद्ययावत असून सर्व सोयीसुविधा शाखेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेळाव्यादरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मेळाव्याला आमदार संजय पोतनीस आणि विभागप्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह महिला विधानसभा संघटक हर्षदा परब, विधानसभा प्रमुख शोभन तेंडुलकर आणि बळीराम घाग यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बाळा गावडे, सुधीर खातू, बळीराम घाग, राजू परब, गीता मोरे, साधना डाळ, वैभव गुरव, श्रुतिका कदम, परशुराम जाधव आदी उपस्थित होते. शगुन नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

युवासेना आणि विजयी शिलेदारांचे अभिनंदन

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडा साफ करून सर्वच्या सर्व दहा जागा युवासेनेने खेचून आणल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या 10 शिलेदारांनी सिनेटवर दणदणीत विजय मिळवला. त्याबद्दल आमदार संजय पोतनीस यांनी युवासेनेचे आणि विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले.