रामानंद तीर्थ आता संकेतस्थळाकर

स्वामी रामानंदतीर्थ यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनने तयार केलेल्या स्वामींवरील संकेतस्थळाचे प्रकाशन अंबाजोगाई येथे होणार आहे. सोहळा स्वामी रमानंद तीर्थ आणि हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ येथे होणार आहे. हा कार्यक्रम शिक्षणतज्ञ आणि स्वामी रामानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

संकेतस्थळ गिरीश घाटे यांनी तयार केले असून ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील संकेतस्थळाची निर्मिती हा व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनच्या महाभूषण या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. फाऊंडेशनने तीनशेहून अधिक अशा असामान्य व्यक्तींची यादी तयार केली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी तीन संकेतस्थळे तयार करण्याचा फाऊंडेशनचा बेत आहे.

हैदराबाद संस्थान निजामाच्या सरंजामशाही राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाले. त्यानंतर राज्याचे त्रिभाजन होऊन मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य नेते म्हणून रामानंद तीर्थ यांचे नाव घेतले जाते.