मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

 चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 2022 या वर्षासाठी प्रतिष्ठsचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या 8 ऑक्टोबर रोजी आयोजित 70 व्या राष्ट्रीय चित्रपट समारंभात मिथुनदा यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

अष्टपैलू अभिनय आणि प्रेक्षकांना भुरळ घालणाऱया चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठत व्यक्तिमत्त्वांपैकी असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची निवड झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, असे पुरस्काराची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले. मिथुनदा यांची चित्रपट कारकीर्द उल्लेखनीय असून त्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रम उदयोन्मुख कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले. या पुरस्कार निवड समितीमध्ये आशा पारेख, खुशबू सुंदर, विपुल अमृतलाल शाह यांचा समावेश होता.

350 हून अधिक चित्रपटांत अभिनय

मिथुन चक्रवर्ती हे आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि विशेष नृत्य शैलीसाठी ओळखले जातात. पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तेलुगू भाषेतील 350 हून अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. ‘मृगया’ (1976) या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्पृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. डिस्को डान्सर (1982) या चित्रपटातील भूमिकेने मिथुन यांना लोकप्रियता मिळाली. अग्निपथ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वोत्पृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात तहादेर कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) या चित्रपटांतील भूमिकांसाठी मिथुनदा यांनी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. याच वर्षी जानेवारीमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.