जम्मू–कश्मीरमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान; दहशतवादी अफजल गुरू, इंजिनीअर रशीद यांचे भाऊ रिंगणात

जम्मू-कश्मीर विधानसभेच्या 40 जागांसाठी आज शेवटच्या तिसऱया टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यात 415 उमेदवार उभे असून, दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ एजाज अहमद गुरू आणि इंजिनीअर रशीद यांचे भाऊ खुर्शीद हेही रिंगणात आहेत.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के, तर दुसऱया टप्प्यात 57.31 टक्के मतदान झाले होते. उद्या 39.18 लाख मतदार आपला हक्क बजावतील. या टप्प्यातील 40 जागांपैकी 24 जागा जम्मू विभागातील आणि 16 कश्मीर खोऱयातील आहेत.

169 उमेदवार लक्षाधीश

तिसऱया टप्प्यात 169 उमेदवार लक्षाधीश असून 67 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. नगरोटा, जम्मू येथील भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंह राणा यांच्याकडे सर्वाधिक 126 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

23 सरकारी अधिकारी निलंबित

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राज्यात आतापर्यंत 23 सरकारी अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच 6 कंत्राटी व तदर्थ कर्मचाऱयांना काढून टाकण्यात आले आहे. अंमलबजावणी यंत्रणांनी 130 कोटी रुपये जप्त केले आहेत.

एजाज अहमद गुरूही रिंगणात

या टप्प्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अफझल गुरूचा मोठा भाऊ एजाज अहमद गुरू हा सोपोर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. विकास आणि रोजगाराच्या मुद्दय़ावरून निवडणूक लढवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंजिनीयर रशीद यांचे भाऊ खुर्शीद अहमद शेख उत्तर कश्मीरच्या लंगेट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ़