जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

नभांगणी उगवला नवा चंद्रमा

रविवारपासून आपल्या नभांगणी एक नवीन चंद्र दाखल झाला आहे. ‘2024 पीटी 5’ या नावाचा हा चिमुकला चंद्रमा फक्त दहा मीटर व्यासाचा असून 53 दिवस त्याचा पृथ्वीच्या कक्षेत मुक्काम राहील. आपल्याला नेहमी दिसणाऱया चंद्राचा व्यास 3,476 किमी इतका आहे हे लक्षात घेतलं तर या नव्या तात्पुरत्या चंद्राचा सूक्ष्मावतार लक्षात येईल. हा नवा पाहुणा साध्या डोळय़ांनी नजरेत येणार नाही, पण विशेष दुर्बिणीने पहाटे दीडनंतर त्याला हुडकता येईल. 53 दिवसांनी हा लघु उपग्रह सौरमालेच्या पुढच्या प्रवासाला निघून जाईल. याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता इस्रोमधील शास्त्रज्ञांनी नाकारली आहे.

बॉलीवूडमध्ये ‘स्त्री 2’ने रचला इतिहास, सातव्या आठवडय़ात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करत आहे. स्त्री 2’ सातव्या विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. बॉलीवूडमध्ये इतिहास रचत ‘स्त्री 2’ ने ‘बाहुबली 2’, ‘केजीएफ 2’, ‘आरआरआर’सारख्या सिनेमांना मागे टाकलंय. ‘स्त्री 2’ ने सातव्या शुक्रवारी 90 लाख रुपयांचे कलेक्शन केले. शनिवारी सिनेमाचे कनेक्शन 130 टक्क्यांनी वाढून 2.1 कोटी रुपये एवढे झाले. रविवारी हे आकडे आणखी वाढले आणि सिनेमाने 2.65 कोटी रुपये कमावले. त्यामुळे सातव्या आठवडय़ाची एकूण कमाई 5.65 कोटी रुपये झाली आणि सिनेमाची आतापर्यंतची एकूण कमाई 588.25 कोटी रुपये झाली. सातव्या आठवडय़ात ‘स्त्री 2’ने अन्य तगडय़ा सिनेमांना धोबीपछाड दिली.

संगीतप्रेमींना फटका, स्पॉटिफाय ठप्प

लोकप्रिय म्युझिक स्ट्रीमिंग ऍप स्पॉटिफायची सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्सला फटका बसला. रविवारी रात्रीपासून स्पॉटिफायची सर्व्हिस बंद झाल्याचा रिपोर्ट करायला युजर्सनी सुरुवात केली. युजर्स ऍपवर लॉग इन करू शकत नव्हते. त्यामुळे आवडीची गाणी ऐकता येत नव्हती. तब्बल 40 हजार युजर्सनी लॉग इनच्या तक्रारी केल्या.

प्रिन्स हॅरीने जागवल्या आठवणी

ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स हॅरी यांनी त्यांची आई प्रिन्सेस डायना यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. कॉनकोर्डीय ऍन्युअल समिट 2024 मध्ये बोलताना प्रिन्स हॅरी यांनी आईसोबतचे विशेष बंध उलगडले. त्याला त्यांनी ‘सिक्रेट्स कनेक्शन’ असे संबोधले. प्रिन्सेस डायना यांच्या स्मरणार्थ मागील 25 वर्षांपासून डायना ऍवॉर्ड दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यात प्रिन्स हॅरी उपस्थित होते.

अमरावती जिल्हा भूकंपाने हादरला

अमरावती जिह्यातील चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यातील अनेक भागांत आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे काही काळ अनेक गावांमध्ये भीतीची वातावरण होते. मेळघाटाचा काही भाग, आमझरी, सातपुडयाचा पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले.

आगीचा पहिल्यांदाच फॉरेन्सिक तपास

तामीळनाडूतील टाटाच्या इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीला शनिवारी भीषण आग लागली. आगीत मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली. ही आग नेमकी कुठल्या कारणामुळे, याचा फॉरेन्सिक तपास करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे आगीचे कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येणार आहे. आयफोनचे भाग तयार करणारा प्लांट या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. हा नवीन प्लांट सोमवारपासून सुरू होणार होता.

अमेरिकेकडून 2.5 लाख नवीन व्हिसा

अमेरिकेने हिंदुस्थानसाठी यावर्षी पुन्हा मोठय़ा संख्येने व्हिसा जारी केले आहेत. पर्यटक, कुशल कामगार आणि विद्यार्थ्यांसह हिंदुस्थानी प्रवाशांसाठी 2 लाख 50 हजार अतिरिक्त व्हिसा जारी करण्यात आल्याचे अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. नुकतेच जारी करण्यात आलेले नवीन स्लॉट लाखो हिंदुस्थानी अर्जदारांना त्यांचा व्हिसा वेळेवर मिळण्यास मदत करतील.

‘त्या‘ कर्मचाऱयाला गुगलने परत बोलावले

कंपनी सोडून गेलेल्या एका कर्मचाऱयाला गुगलने पुन्हा कामावर घेतले. विशेष म्हणजे त्याच्यासाठी गुगलने फार मोठी रक्कम मोजली. आर्टिफिशल इंटेलिजन्स जिनीयस असलेल्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर नाराज होऊन त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी गुगलने 2.7 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली.