आपल्याकडच्या रस्त्यांवरील खड्ड्यात मत्स्यपालन होऊ शकते, भाजप नेत्याला सरकारला घरचा आहेर

उत्तर प्रदेशमधील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सध्या तेथील जनतेला प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान याचा फटका भाजपचे माजी आमदार आनंद शुक्ला यांना देखील बसला असून त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत भाजपला यावरून फटकारले आहे.

आनंद शुक्ला यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ”उत्तर प्रदेशचे रस्ते मत्स विभागाच्या ताब्यात द्यायला हवे. ते या रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत त्यात मत्स्यपालन करू शकतील. धर्मनगरी चित्रकूट ते कौशंबीदरम्यानच्या प्रवासाचा हा अनुभव आहे’. आनंद शुक्ला हे भाजपचे माणिकपूरचे माजी आमदार आहेत.

राज्यात तुम्ही कुठल्याही दिशेने जा सगळीकडे खड्डेच खडे आहे. रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. चित्रकूट ते कौशंबीदरम्यानच्या रस्त्याची इतकी वाईट अवस्था आहे आता या सगळ्याची हद्दच झाली आहे. एवढे खड्डे आहेत की त्याची गणनाच नाही होऊ शकत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते मंडळाला याबाबत अनेकदा सांगितले मात्र कोणीच ऐकायला तयार नाही. कोणी लक्ष देत नाही”, अशी खंत आनंद शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.