कोपरीतील दौलतनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. क्लस्टरच्या विकासामुळे रहिवाशांना शास्वत, प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी आमचे क्लस्टर का रोखता, असा सवाल दौलतनगरमधील रहिवाशांनी केला आहे. दरम्यान अपप्रचाराला सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका सदस्यांनी घेतली आहे.
ठाण्यातील पूर्व भागात असलेली दौलतनगर सोसायटी सुमारे 60 वर्षे जुनी आहे. सोसायटीला अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहात आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता इमारतीचा पुनर्विकास थांबवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे.
32 टक्के वाढीव क्षेत्र मंजूर
शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे दौलतनगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर अनेक सुविधा मिळून दौलतनगर रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.