तुमचा दसरा मेळावा मुंबईत नाही, सूरतमध्ये घ्या! संजय राऊत मिंधे गटावर बरसले

लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून ती उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंधे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मत विकत घेण्याची योजना आहे, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. त्यासोबतच दसरा मेळाव्याच्या जागेवरून देखील संजय राऊत यांनी मिंधे गटाला खडेबोल सुनावले.

‘मिंधे सरकारने लाडक्या बहिणींवर फार प्रेम उफाळून आलेलं आहे म्हणून ही योजना आणलेली नाही. तर मतं विकत घेण्याची ही योजना आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे, प्रकल्पाचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत’, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. लाडक्या बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच मारामारी असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे. त्यातून मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे’.

गडकरी यांच्या विधानाचा आधार घेत, ‘ते जे म्हणातत ते बरोबर आहे. पण अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्राचं वित्त मंत्रालय, गृहमंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचा अधिकार आहे आणि कर्तव्य आहे. कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल. अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, पंतप्रधान यांची जबाबदारी आहे की नाही?’, असे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.

‘गडकरीजी ज्येष्ठ नेते, मंत्री आहेत. मला वाटत त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात हा प्रश्न मांडायला हवा’, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

तुमचा दसरा मेळावा सूरत मध्ये घ्या!

‘एकनाथ शिंदें यांनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये. तुमची दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, जिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दोन-अडीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी दोन जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करू शकतात. यातील पहिलं ठिकाण म्हणजे सूरत आणि दुसरं म्हणजे गुवाहाटी. कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात. सूरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सूरत मध्ये झाला आहे’, अशा कडक आणि स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी मिंधे गटावर निशाणा साधला आहे.