हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोरा-भाऊचा धक्का ही प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना याचा फटका बसणार असून त्यांना रस्तेमार्गे मुंबई व रायगड गाठावे लागणार आहे.
विस्थापित आणि वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचा प्रलंबित प्रश्न मागील 38 वर्षांनंतरही सुटला नाही. यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी भरसमुद्रात चॅनल बंद करून जहाजे रोखण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेट वे-जेएनपीए आणि मोरा-भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक बंद करण्याच्या सूचना मोरा सागरी पोलिसांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला पत्राद्वारे केली आहे. यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी व कामगारांची मोठी गैरसोय होणार आहे.