…तोपर्यंत राजीनामा देणार नाही, सिद्धरामय्यांचे विरोधकांना स्पष्ट उत्तर

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) कडून जमीन वाटपाशी संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधीपक्षात असलेल्या भाजपकडून राजीनामा मागितला जात आहे. मात्र जोपर्यंत त्यांना ‘लोकांचा पाठिंबा आहे’ तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडत सिद्धरामय्या यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

सिद्धरामय्या यांनी रविवारी सांगितलं की, जोपर्यंत मवा ‘लोकांचा पाठिंबा आहे’ तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही किंवा कोणासाठीही ‘आपली पद्धत बदलणार नाही’. त्यांच्याविरोधात एका कथित घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलली आहे.

MUDA ने नियमांचे उल्लंघन करून त्यांच्या पत्नीला अतिमहत्त्वाच्या मालमत्तांचे वाटप केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, राज्य भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेने 27 सप्टेंबर रोजी MUDA जमीन घोटाळ्याच्या संदर्भात सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

राज्यातील विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर म्हैसूरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना सिद्धरामय्या म्हणाले, ‘मी राजीनामा देणार नाही किंवा कोणापुढेही झुकणार नाही. महात्मा गांधी म्हणाले होते की न्यायालये आहेत आणि नंतर विवेक आहे, जो सर्व न्यायालयांच्या वर आहे. विवेक हे सर्वोच्च न्यायालय आहे. माझा विवेक स्पष्ट आहे आणि जोपर्यंत मला लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत मी हलणार नाही’.

ते पुढे म्हणाले की राजकीय आव्हानांमुळे ते ‘घाबरणार नाहीत’. तसंच पुढे म्हणाले की, माझ्या विरोधकांनी काही महिने त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही कायदेशीर आणि राजकीय दोन्ही मार्गांनी कोणत्याही अडथळ्यांना तोंड देण्याच्या आणि त्यावर मात करण्याच्या क्षमतेवर मला विश्वास आहे.