सीबीआय अधिकारी सांगून पैसे उकळले

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ठगाने महिलेची 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. खार येथे वृद्ध महिला राहतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो सीबीआय बंगळुरू येथून विनय कुमार चैबे बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात बंगळुरू न्यायालयात रिट याचिका दाखल आहे. तेव्हा महिलेने याचिकेबाबत विचारणा केली.

तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून बनावट बँक खाती उघडण्यात आली आहे. त्या खात्यावरून नरेश गोयल यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले आहेत. गोयल यांना मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात तुम्हालादेखील अटक करण्यात येऊ शकते. महिलेने आपण गोयल यांना ओळखत नसून आपले बँक खाते नसल्याचे ठगाला सांगितले.

ठगाने महिलेला दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जाऊन तुम्ही पैसे घेतले की नाही हे सिद्ध करा असे सांगून घाबरवले. भीतीपोटी महिलेने त्याला काही उपाय सूचविण्यास सांगितले. ठगाने महिलेला पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा महिलेने तिच्या खात्यातील पैशांची माहिती ठगाला दिली. ठगाने महिलेला स्काय पे हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

या प्रकरणातून बाहेर काढतो सांगून बँक खात्याची माहिती घेतली. कारवाईच्या भीतीपोटी महिलेने 8 लाख 80 हजार रुपये विविध खात्यांत जमा केले. पैसे जमा केल्यावर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.