जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिह्यात एका सभेत भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावरच बेशुद्ध पडले. बरे वाटल्यानंतर खरगे पुन्हा व्यासपीठावर आले आणि त्यांनी तडाखेबंद भाषण केले. ‘मी 83 वर्षांचा आहे, पण इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदींना हटवत नाही तोपर्यंत जिवंत राहीन, असे सांगत त्यांनी मोदी आणि भाजपवर हल्ला केला.
कठुआ येथे प्राण गमावलेल्या हवालदाराला श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांची तब्येत खालावली होती. भाषण करताना खरगे यांचा आवाज क्षीण झाला आणि ते अचानक बेशुद्ध झाले. त्यामुळे गर्दीत गोंधळ उडाला. व्यासपीठावर उभ्या असलेल्या पदाधिकारी आणि अंगरक्षकांनी त्यांना आधार देऊन बसवले. बरे वाटल्यानंतर पुन्हा उभे राहून त्यांनी भाषण केले. जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी लावून धरेन, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी फोन करून खरगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भाजपला जम्मू-कश्मीरात कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षांत निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना नायब राज्यपालांच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते.