व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील ‘निर्लज्ज’ शब्दामुळे शासकीय नोकरीतून केले निलंबित, गतिमान सरकारचा गतिमान कारभार

<<< राजेश चुरी >>>

आरटीओ कर्मचाऱ्यांचा एका खासगी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या पोस्टमध्ये ‘निर्लज्ज’ असा शब्दप्रयोग केल्यामुळे अंधेरी आरटीओमधील एका कर्मचाऱ्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. निलंबनाची नोटीस व्हॉट्सअ‍ॅपवरच पाठवली आहे. पण निर्लज्ज हा शब्द असंसदीय नाही असा आक्षेप कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अशा कारवाईने सरकार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातल्या आरटीओ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा संप पुकारला होता. पण परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर कामगार संघटनांनी संप मागे घेतला. त्यानंतर अंधेरी आरटीओमधील एका वरिष्ठ लिपिकाने कर्मचाऱ्यांच्या एका खासगी ग्रुपवर मेसेज पोस्ट केला. त्यामध्ये ‘निर्लज्ज’ असा शब्दप्रयोग केला होता.

हा मेसेज आरटीओ कर्मचाऱ्यांच्या विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला, पण संपात सहभागी न झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आरटीओ प्रशासनाकडे पोहोचवला. प्रशासनाच्या आवाहनामुळे आम्ही कामावर हजर झालो, पण आमच्या विरोधात असा प्रचार होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टची गांभीर्याने दखल घेत परिवहन प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले.

मेसेजमध्ये काय म्हटलेय

‘संपात सहभागी झाल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार आणि संप यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि हो संपात सहभागी नव्हते त्यांनी निर्लज्जपणे संपातून मिळालेल्याचा फायदा घ्यावा. जय संघटना.’

आरटीओ कर्मचारी संघटनेने संप पुकारल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, कामावर हजर व्हावे असे आवाहन सरकारने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात लिहिले तर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. कारवाईच्या पत्रावर सही करून त्याची प्रत आरटीओला ई-मेल केली आहे. कर्मचाऱ्याला प्रत दिली जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली असेल तर मला कल्पना नाही, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

संबंधित कर्मचाऱ्याने कोणालाही व्यक्तिशः तसेच शासकीय ग्रुपवरून मानहानीकारक शेरेबाजी केली नसल्याचे दिसून येते. प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याऐवजी एक संधी देणे गरजेचे होते. प्रशासनाने याचा विचार करून तत्काळ निलंबन रद्द करावे. या सर्व प्रकरणाची संघटनेने गंभीर दखल घेतली आहे, असे मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सरचिटणीस सुरेंद्र सरतापे म्हणाले.