मंगळाचा पृष्ठभाग तांबूस, लालसर आहे हे आपण सर्वच जाणतो. पण याच मंगळावरील प्रतिकूल परिस्थितीत निवास करण्याच्या प्रयत्नात मानवाला बरेच काही गमवावे लागू शकते. ‘फ्यूचर ह्युमन्स’ या त्यांच्या पुस्तकात डॉ. स्कॉट सोलोमन यांनी दावा केला आहे की, मंगळाच्या पृष्ठभागावरील घातक परिस्थितीमुळे, लाल ग्रहावर मानवांना जगणे, वंशवृद्धी करणे अत्यंत कठीण आहे.
तिथे जगताना लोक हिरवे होऊ शकतात आणि त्यांची दृष्टीही कदाचित गमावू शकतात, असे टेक्सास येथील राइस युनिव्हर्सिटीमधील जीवशास्त्रज्ञ सोलोमन यांनी स्पष्ट केले. लाल ग्रहावरील मानवी वसाहतींमध्ये जन्मलेल्या मुलांना पराकोटीचे बदल, बिघाड आणि उत्क्रांतीवादी बदलांचा अनुभव येईल. कमी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि उच्च किरणोत्सर्गामुळे मंगळावर मानवाच्या त्वचेचा रंग हिरवा, स्नायू कमकुवत, दृष्टी खराब आणि हाडे ठिसूळ होऊ शकतात, असे डॉ. सॉलोमन म्हणतात. मंगळावर पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण, 30 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तिथे चुंबकीय क्षेत्र आणि वातावरणाचे संरक्षण करणारा ओझोन थरही नाही. यामुळे अंतराळातून ग्रहाकडे येणारा किरणोत्सर्ग, अतिनील किरणे, सूर्य व वैश्विक किरणांचा मारा, भारीत कण या सगळ्यांचा मारा मंगळाला झेलावा लागतो. येथे वसाहत करणाऱ्या मानवाच्या त्वचेचा रंग याच किरणोत्सर्गाचा सामना करताना बदलू शकतो, असे डॉ. स्कॉट यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.