लाडक्या बहिणींचा ‘देवा’च भाऊ, भाजपने मिंधे-अजितदादांना निवडणुकीआधीच लाथाडले! राज्य सरकारच्या योजनेत मोदींचा उदो उदो

लाडक्या बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपने मिंधे आणि अजितदादांना लाथाडायला सुरुवात केली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्र पाठवून लाडक्या बहिणींचा ‘देवा’च भाऊ असल्याचा संदेश पोहोचवायला सुरुवात केली आहे. फडणवीसांकडून पाठविण्यात येणाऱ्या या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आणि फोटोला पद्धतशीरपणे बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदो उदो करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार डोईजड होऊ नये याची पुरेपूर दक्षता भाजपकडून घेतली जात आहे. महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना या भाजपच्या असल्याचे राज्यातील जनतेच्या मनात बिंबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाडक्या बहीण योजनेत पात्र ठरलेल्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने पत्र पाठविण्यात येत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ असे या योजनेचे नाव असताना ‘मुख्यमंत्री’ हे नाव ठळकपणे नजरेस येणार नाही याची काळजी या पत्रामध्ये घेण्यात आली आहे. बहिणींचा लाडका भाऊ हा देवेंद्र फडणवीसच असल्याचा भ्रम तयार करण्यात येत आहे. यावरून कोणत्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व पुन्हा मिंधे यांच्याकडे जाऊ नये यासाठी भाजपने आतापासूनच हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

पत्रात काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून महिलांचे जीवन सुखी करण्यासाठी काम करत आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला एसटी तिकिटात 50 टक्के सवलत. लेक लाडकी योजनेमुळे मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत लखपती झालेली असेल. मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे. या विकासाच्या प्रवाहामध्ये आपली एकही बहीण वंचित राहू नये यासाठी तुला साद घालतो, असे पत्रात म्हटले आहे.

बहिणींच्या काळजीपेक्षा मतांची चिंता अधिक

राज्यात महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांचा घोषवारा पत्रात मांडून बहिणींबद्दल आपल्याला किती प्रेम आणि काळजी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. या पत्रावर भाजपच्या प्रमुख नेत्यांचे छापण्यात आलेले फोटो पत्र आणि त्याच्या पाकिटावर छापण्यात आलेले कमळ हे पक्षाचे चिन्ह यावरून बहिणींच्या काळजीपेक्षा देवाभाऊ व भाजपला मतांची चिंता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

पत्रात महायुतीचा उल्लेखही टाळला

केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या या पत्रात केवळ भाजपचा उल्लेख करण्यात आला आहे. महायुती सरकार किंवा महायुतीच्या घटक पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा नामोल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.