मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी मनमानी कारभार करणाऱया अदानी व्यवस्थापनाला शिवसेनेच्या दणक्याने अखेर जाग आली. महाराष्ट्र वाहतूक सेनेने जाब विचारताच विमानतळ हेल्पडेस्कच्या ठिकाणी दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य उल्लेख करत अदानी व्यवस्थापनाने आपली चूक सुधारली.
मुंबई विमानतळाच्या हेल्पडेस्कवर एकदम तळाशी ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. हेल्पडेस्कच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना झालेली चूक सुधारण्यात यावी, अशी ताकीद महाराष्ट्र वाहतूक सेनेने अदानी व्यवस्थापनाला दिली होती.
महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्याध्यक्ष अशोक टाव्हरे, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, साईकुमार माळोदे, नारायण पवार, चिटणीस धर्मेश राठोड व इतर पदाधिकारी यांनी अदानी व्यवस्थापनाला यासंदर्भात जाब विचारला. याची गंभीर दखल घेत अदानी व्यवस्थापनानाने विमानतळ हेल्पडेस्कच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख योग्य पद्धतीने करत चूक सुधारली.