अनुकूल वातावरण व जमिनीची सुपीकता, विभागानुसार 300 ते 5 हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस, अशा वातावरणामुळे जिह्यात सुमारे 7 हजार हेक्टरवर तब्बल 40 प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. जिह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशांत निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे.
महाबळेश्वर, कोयनानगर येथे जून ते सप्टेंबरदरम्यान 5 हजार मिलिमीटरच्याकर पर्जन्यमान होते. जिह्यात अशी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे विविध भागांत वेगवेगळी पिके घेण्यात येतात तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिह्यात 40 प्रकारची फळे घेण्यात येतात. जिह्यात सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱया भागात होतात, तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. या फळबागातून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पर्यटन सुरू झाले, तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे. बळीराजासाठी हे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी इकडे वळत आहेत.
जिह्यातील फळ लागकड अन् क्षेत्र (हेक्टरमध्ये) द्राक्ष – 618, डाळिंब 1,400, आंबा 1,486, काजू – 14, सीताफळ – 690, पेरू – 450, कागदी लिंबू – 68, चिकू – 227, नारळ – 151, बोर – 26, आवळा 42, जांभूळ – 26, फणस 20, चिंच 82, अंजीर 19, संत्री – 02, मोसंबी – 04, सफरचंद – 03, केळी – 275, पपई – 55, ड्रगनफ्रूट – 70, स्ट्रॉबेरी – 1,037, कलिंगड – 81, टरबूज – 18, रासबेरी – 10, गुजबेरी – 10, ब्लूबेरी – 01, मलबेरी – 22, खजूर – 02.
फळबागांचे होणारे फायदे
n फळपिकात आंतरपीक घेता येते, कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते, शाश्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण, पर्यटनाच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकते, रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत, दुष्काळी तालुक्यात पर्यटन, एकाच ठिकाणी अनेक फळबागा, पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री, फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार काढणार.