केरळ राज्यात सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क करण्याचे दुकान थाटलेल्या आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील भामटय़ाने तेथील एका सराफाची तब्बल 1 कोटी 80 लाखांची फसवणूक केली होती. त्याच्या शोधार्थ केरळ पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने त्यांनी भिवघाट (ता. खानापूर) येथे कारवाई करीत भामटय़ास अटक केली.
विश्वास रामचंद्र कदम (वय 34, रा. कौठुळी, ता. आटपाडी) असे संशयिताचे नाव आहे.
संशयित विश्वास कदम याचे केरळ राज्यातील थ्रिसूर ईस्ट येथे सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क करून देण्याचे लक्ष्मी नावाचे दुकान आहे. त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम आणि अन्य दोघे सहकारी आहेत. फिर्यादी सदानंदन पोनापन्न या सराफाचा विश्वास संशयित कदम यांनी संपादन केला होता. फिर्यादी पोनापन्न यांनी कदम यास 2 हजार 255.40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्याकरिता दिले होते. त्याची किंमत 1 कोटी 80 लाख रुपये होती. संशयिताने ते दागिने घेतल्यावर काही दिवसांनी तो पसार झाला होता. याबाबत थ्रिसूर ईस्ट येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित विश्वास कदम हा आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील असल्याने त्याच्या शोधार्थ केरळचे पोलीस सांगली जिह्यात दाखल झाले होते. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सहकार्याने संशयिताचा शोध सुरू केला होता. पोलीस तपासात संशयित विश्वास कदम हा भिवघाट येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास तेथे जाऊन अटक करून केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.