हिंदुस्थानी नेमबाजांचा डबल धमाका; दहा मीटर एअर रायफलमध्ये मुले व मुलींच्या संघांचा सुवर्णवेध, ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद

हिंदुस्थानने लिमा (पेरू) येथे सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सांघिक सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. या दोन्ही संघांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून हिंदुस्थानच्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली.

मुलांच्या गटात उमेश चौधरी, पद्युम्न सिंह व मुकेश नेलवल्ली या त्रिकुटाने, तर मुलींमध्ये कनिष्का डागर, लक्षिता व अंजली चौधरी या तिकडीने हिंदुस्थानला हे सोनेरी यश मिळवून दिले. उमेश, प्रद्युम्न व मुकेश यांनी सर्वाधिक 1726 गुणांची कमाई केली. रोमानियाला 1716 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर इटलीने 1707 गुणांसह कांस्यपदक जिंकले. मुलांच्या वैयक्तिक गटात रोमानियाच्या लुका जोल्डियाने सुवर्णपदक जिंकले. चिनी तैपेईच्या हसिह सियांगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटात कनिष्का, लक्षिता व अंजली या हिंदुस्थानी संघाने 1708 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. अझरबैजानला 1707 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर युव्रेनच्या संघाने कांस्यपदक जिंकले. कनक हिने वैयक्तिक गटात 217.6 गुणांसह कांस्यपदकालाही गवसणी घातली. डागर आठव्या स्थानी राहिली. चिनी तैपेईच्या चेन यू-चुनने सुवर्ण, तर स्लोवाकियाच्या मांजा स्लॅक हिने रौप्यपदक जिंकले.

मुकेश चौधरीला 2 गुणांचा दंड

उमेश चौधरी व प्रद्युम्न सिंह 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पात्रता फेरीत अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानी राहिले. चौधरीने 580, तर प्रद्युम्नने 578 गुणांची कमाई केली, मात्र अंतिम फेरीसाठी शूटिंग रेंजवर उशिराने आल्याने उमेश चौधरीला 2 गुणांचा दंड करण्यात आला. त्यामुळे फायनलमध्ये उमेश व प्रद्युम्न यांना अनुक्रमे सहावे व आठवे स्थान मिळाले.