पावसाची बॅटिंग अन् तिसरा दिवसही पाण्यात, हिंदुस्थान-बांगलादेश तिसरी कसोटी अनिर्णितावस्थेकडे

हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानच्या दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱया दिवसाचा खेळही एकही चेंडू न टाकताच रद्द करावा लागला. सकाळीच पावसाने बॅटिंग केली अन् रविवारचा खेळही पाण्यात गेला.

उभय संघांमधील दुसरा आणि अखेरचा सामना कानपूरमध्ये खेळविला जात आहे. मात्र रविवारी सकाळीच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने ग्राऊंडचे आऊटफिल्ड ओले झाले. ‘बीसीसीआय’ने मैदान सुकविण्यासाठी तीन सुपर सॉपर लावले होते. शंभर कर्मचारी मैदान सुकविण्यासाठी जिवाचे रान करीत होते, मात्र तरीही यश आले नाही. शेवटी पंचांनी मैदानाची पाहणी करून तिसऱया दिवसाचाही खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. कसोटीच्या सुरुवातीच्या दोन्ही दिवशी पावसाचेच वर्चस्व बघायला मिळाले. शुक्रवारी (दि. 27) पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ होऊन त्यात बांगलादेशने 3 बाद 107 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. शनिवारी (दि.28) दुसऱया दिवशीही पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. आता तिसरा दिवसही पावसात वाहून गेल्याने हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यानची दुसरी कसोटी अनिर्णित राहणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.