गुरुग्राममध्ये व्हॉट्सअॅपवर गुन्हा दाखल
सायबर गुन्हेगारी प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी व्हॉट्सअॅपकडे काही मदत मागितली होती. मात्र व्हॉट्सअॅपने मदत केली नाही. त्यामुळे गुरुग्राम पोलिसांनी व्हॉट्सअॅप आणि त्याच्या नोडल अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संवेदनशील प्रकरणाच्या तपासात गुरुग्राम पोलिसांनी 17 जुलै रोजी व्हॉट्सअॅपला ई-मेल करून नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. अनेकदा विनंती करूनही मेटाच्या या अॅपने पोलिसांना सहकार्य केले नाही.
रिलायन्सचा भाव वाढला 8 कंपन्यांचे मूल्य वाढले
गेल्या आठवड्यात देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मूल्य तब्बल 1.21 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला प्रचंड फायदा झाला आहे. आठवडाभराच्या व्यवहारात रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 53,653 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच सध्या कंपनीचे मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल तब्बल 20.65 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एलआयसी आणि इन्पहसिसचे मार्केट कॅपदेखील वाढले आहे.
राम रहीमला हवा आणखी पॅरोल
बलात्कार आणि हत्येच्या गुह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित बाबा गुरमीत राम रहीम यांनी आणखी 20 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला आहे. हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी उरला असतानाच त्याने हा अर्ज केल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. सरकारने राम रहीमचा पॅरोलवरील सुटकेच्या मागणीसाठी केलेला अर्ज हरयाणाच्या मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, राम रहीम हा दहा वेळा पॅरोलवर बाहेर आला आहे.
सात दिवसांचा प्रवास अवघ्या 23 तासांत
टांझानियातील किलीमांजरो हे तब्बल 5895 मीटर उंचीवर असलेले आव्हानात्मक शिखर सर करायला सात दिवस लागतात. पण हिंदुस्थानच्या नकुल कुमार यांनी अवघ्या 23 तासांत हे शिखर सर करण्याची किमया करून दाखवली आहे. या मोहिमेसाठी नकुल यांनी प्रचंड मेहनत घेतली. पाठीवर सामान घेऊन 150 ते 180 मजले चढाई केली. 8 ते 9 तास व्यायाम केला. टांझानियातील वातावरणाची सवय व्हावी यासाठी अमेरिकेतून सिम्युलेटर तंबू मागवला. या तंबूत 45 दिवस त्या तंबूत झोपलो अशी तपश्चर्या केल्याचे नकुल यांनी सांगितले.
स्वतःशीच लग्न करणाऱ्या तुर्की युवतीची आत्महत्या
‘नवरदेवाविना मी माझ्याशीच केले लग्न’ अशा प्रकारची लक्षवेधी जाहिरात करून स्वतःशीच विवाहबद्ध झालेल्या कुब्रा अयकूट या तुर्की टिकटॉक इन्फ्लुएन्सरने आत्महत्या केली आहे. इस्तंबूलच्या सुल्तानबेली जिह्यातील एका लक्झरी अपार्टमेंट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुब्रा खाली पडलेली आढळून आली. तिचे वजन पाहिजे तसे वाढत नसल्यामुळे ती चिंताग्रस्त होती. तिने एक भावपूर्ण पोस्ट केली होती. माझे वजन वाढत नाहीय, दररोज माझे वजन एका किलोने कमी होतेय, मला तातडीने वजन वाढवण्याची गरज आहे, असे तिने म्हटले होते.
हरयाणासाठी राहुल, प्रियांका यांचा जोरदार प्रचार
हरयाणात भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत असताना पक्षाचे नेते राहुल आणि प्रियांका गांधी जोमाने प्रचार करत आहेत. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राहुल यांची ‘हरयाणा विजय संकल्प यात्रा’ अनेक जिह्यांमधून प्रचारासाठी फिरणार आहे. या वेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. सोमवारी अंबाला जिह्यातील नारायणगड येथून एका जाहीर सभेनंतर राहुल यांची यात्रा पुढे सरकेल आणि संध्याकाळी कुरुक्षेत्रच्या ठाणेसर येथेही त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि कुमारी सेलजा यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेतेही असतील.
हरयाणा भाजपमध्ये बंडाळी, 8 जणांची हकालपट्टी
हरयणातील निवडणुकीत भाजपने उम्देवारी नाकारल्यावर बंडाळी झाली असून, मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून प्रमुख कार्यकर्ते, नेते आखाड्यात उतरले आहेत. माजी मंत्री रणजीत चौटाला, सैनींविरुद्ध लाडवामधून अर्ज दाखल केलेले संदीप गर्ग यांच्यासह 8 जणांची भाजपने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. चौटाला यांनी तिकीट नाकारल्यानंतर पद सोडले होते. माजी मंत्री बचनसिंह आर्य, माजी आमदार देवेंद्र काद्यान यांचाही कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.
कोलकात्यात सुरक्षेच्या मागणीसाठी डॉक्टरांचे मोर्चे
आरजी कार रुग्णालयातील बलात्कार आणि हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल सोमवारी येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी याप्रकरणी न्याय व्हावा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळावी या मागणीसाठी विविध सरकारी रुग्णालयांतील कनिष्ठ डॉक्टरांनी रविवारी शहरभर मशाल मोर्चे काढले. कार हॉस्पिटल, सगोर दत्ता हॉस्पिटल, एसएसकेएम हॉस्पिटल, कोलकाता मेडिकल कॉलेज आणि जाधवपूर येथून हे मोर्चे निघाले. सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या गरजेवर डॉक्टरांनी भर दिला आहे.
बियास सतलज प्रकल्पाची सुरक्षा सीआयएसएफकडे
हिमाचल प्रदेशातील बियास सतलज लिंक प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. मंडी येथील कार्यक्रमात रविवारी 235 जवानांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील सुरक्षेची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी आणि भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी यासाठी उपस्थित होते. सिंचन, पूर नियंत्रण आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प उत्तर हिंदुस्थानातील सर्वात मोठा आणि ‘सर्वात महत्त्वपूर्ण’ प्रकल्प आहे. वीजनिर्मितीसाठीही या प्रकल्पातून उपलब्ध होणारा पाणीसाठा महत्त्वाचा आहे. आतापर्यंत स्थानिक पोलीस या प्रकल्पाची सुरक्षा सांभाळत होते.
महादेव गुरव यांचे निधन
हसुरसासिरी येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक महादेव अण्णाजी गुरव यांचे 28 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. दैनिक ‘सामना’चे माजी वरिष्ठ उपसंपादक/वार्ताहर अनंत गुरव यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची रक्षा विसर्जन 30 सप्टेंबर रोजी हसुरसासिरी येथे होणार आहे.