‘चांद्रयान – 3’ चंद्राच्या सर्वात जुन्या विवरावर उतरले, 3.85 अब्ज वर्षांपूर्वी झाली विवराची निर्मिती

चांद्रयान – 3 चंद्राच्या ज्या पृष्ठभागावर उतरले, त्या जागेचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले आहे. चांद्रयान -3 जिथे उतरले त्याचे नाव शिवशक्ती पॉइंट असे ठेवण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की, चांद्रयान – 3 ज्या विवरात उतरले होते, ते विवर 3.85 अब्ज वर्षांपूर्वी नेक्टेरियन काळात तयार झाले होते. नेक्टेरियन कालावधी हा चंद्राच्या इतिहासातील सर्वात जुन्या काळांपैकी एक आहे.

चांद्रयान मोहीम आणि सॅटेलाईट इमेजचे विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी हे अनुमान काढले आहे. कोणताही ग्रह, उपग्रह किंवा खगोलीय वस्तूने होणाऱ्या भल्यामोठ्या खड्ड्याला विवर म्हटले जाते. ज्वालामुखीच्या विस्फोटानेही विवर निर्माण होतात. उल्कांमुळेही विवरांची निर्मिती होती. भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या प्लॅनेटरी सायन्स विभागातील सहयोगी प्राध्यापक एस विजयन यांनी सांगितले की, चांद्रयान – 3 लँडिंग साइट एक अद्वितीय भूवैज्ञानिक जागा आहे.