डॉक्टरला देव मानलं जातं. जात, धर्म, प्रांताच्या पलीकडे जाऊन डॉक्टर रुग्णसेवा करतात. मुंबईतील नेत्र सर्जन डॉ. कुरेश मस्कती यांनी नुकतंच याचे दर्शन घडवलं. अंधत्व आलेल्या एका पाकिस्तानी रुग्णाला व्हिसा मिळत नव्हता म्हणून डॉ. मस्कती यांनी श्रीलंकेत जाऊन त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले आणि रुग्णाच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला.
लाहोर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय रुग्णाच्या चेहऱ्यावर केमिकल पडून त्याची दृष्टी गेली होती. त्यानंतर त्याने दोन वेळा कॉर्निया ट्रान्सप्लांट केले. मात्र तेही अयशस्वी झाले. मुंबईतील डॉ. मस्कती एकदा पाकिस्तानात कॉन्फरन्सला गेले असता त्यांची भेट रुग्णाशी झाली होती. कृत्रिम कॉर्नियामुळे त्याचे डोळे ठीक होऊ शकतील, असे डॉ. मस्कतींना वाटले.
मात्र रुग्णाला हिंदुस्थानात येण्याचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे डॉ. मस्कतींनी श्रीलंकेत जाऊन रुग्णावर अवघड अशी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मस्कती म्हणाले, मी कोलंबोत एका कॉन्फरन्ससाठी जाणार होतो. त्यामुळे त्या रुग्णावर श्रीलंकेत शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती मी श्रीलंकेच्या मेडिकल कौन्सिलला केली.
चार वर्षांनंतर कुटुंबीयांना पाहू शकलो
श्रीलंकन मेडिकल कौन्सिलने परवानगी दिल्यानंतर डॉ. मस्कती यांनी स्थानिक नेत्र सर्जन डॉ. कुसुम रत्नायके यांच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी कोलंबोत शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 48 तासांत रुग्णाला थोडं दिसू लागलं. 24 सप्टेंबरला रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. चार वर्षांनंतर कुटुंबीयांना पाहू शकलो, अशी प्रतिक्रिया रुग्णाने दिली.