शुक्रवारी (27 सप्टेंबर) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह अखेर सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरूनच मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र भीषण बॉम्ब हल्ल्यात खात्मा झालेल्या नसरल्लाहच्या मृतदेहावर एकही जखम नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहच्या चीफचा मृतदेह सापडला आहे. दोन सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला आहे. एका वैद्यकीय आणि सिक्युरिटीच्या सुत्रांकडून सांगितले की, बेरूतच्या दक्षिणी उपनगरात इस्रायली हवाई हल्ल्याच्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला आहे.
हसन नसरल्लाहच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून मोठा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. नसरल्लाहचा मृत्यू बॉम्बच्या प्रचंड आवाजामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण हल्ल्यात नसरल्लाह याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले असून, फक्त त्याची अंगठी सापडल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र आता त्याचा मृतदेह अखंड सापडला आहे.
दुसरीकडे, इस्रायलने सांगितले की, हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले सुरूच आहेत. एका नवीन अपडेटमध्ये, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी गेल्या काही तासांत लेबनॉनमधील अनेक हिजबुल्लाह तळांवर हल्ला केला आहे. लष्कराच्या म्हमण्यानुसार, हिजबुल्लाहचे रॉकेट लाँचर आणि शस्त्रास्त्रांची गोदामे उद्ध्वस्त करणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे म्हणणे आहे.