जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये रविवारी चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर दहशतवाद्याचा खात्मा करणारा एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. या कारवाईत इतर काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. इतर दहशतवाद्यांची शोध मोहीम सध्या सुरू आहे.
कठुआच्या मांडलीमध्ये तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर परिसरात शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात गोळीबार झाला.
हे परदेशी दहशतवादी असल्याची माहिती मिळते. शोध मोहिमेनंतर अधिक तपशील समोर येतील, असे एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.