महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात

मिंधे सरकारने चंद्रपूर येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा अदानी फाऊंडेशनला चालवायला दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? असा खडा सवाल केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शालेय शिक्षण विभागाचे पत्रक शेअर केले आहे. ‘महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का?’, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

‘शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे’, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.