व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांवर एंबरग्रीस तस्करीच्या गुन्ह्याखाली ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या उलटीची किंमत कोट्यावधींमध्ये असल्याचे समजते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे पोलीस कार्यालयाकडून सांगण्यात आले की, 27 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक दत्ताराम भोसले यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, काही लोक दुपारी दोनच्या सुमारास वॅगनार कारमधून डोंबिवली परिसरात व्हेलच्या उलटी विकण्यासाठी येणार आहेत. यानंतर ठाणे पोलिसांनी घटनास्थळ गाठून वॅगनार कारमधून बॅगेत ठेवलेला अंबरग्रीस जप्त केला. यासोबतच तिघांना अटक देखील करण्यात आली. यामध्ये अनिल भोसले (55), अंकुश शंकर माळी (45) आणि लक्ष्मण शंकर पाटील (63) अशी आरोपींची नावे आहेत.
परफ्यूम उत्पादक कंपन्यांमध्ये याला मोठी मागणी आहे. याचा उपयोग परफ्यूमला दीर्घकाळ सुरक्षित आणि सुगंधित ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कंपन्या त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत. याशिवाय व्हेलच्या उलटीचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर महागडी दारू आणि सिगारेट बनवण्यातही त्याचा उपयोग होतो.