करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग; गर्भगृहाच्या स्वच्छतेमुळे दिवसभर दर्शन बंद

शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. या पाश्र्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही स्वच्छतेला वेग आला आहे. आज परंपरेनुसार मूळ मूर्तीला विधिवत इरलं पांघरून गर्भगृहाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.

मंदिरातील महासरस्वती मंदिराजवळ श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिवसभरात देवीच्या सोन्या-चांदीच्या अलंकारांसह साहित्याची स्वच्छता करण्यात आली. गरुड मंडपाची प्रतिकृतीही उभारण्यात येत आहे. सायंकाळी आरती आणि सालंकृत पूजा झाल्यानंतर मूळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.

देवीच्या सोने-चांदी व हिरेजडित दागिन्यांची स्वच्छता

देवीच्या नित्य व उत्सवकाळातील चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवात देवीला नित्यालंकारांमध्ये म्हाळुंग, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल, १६ पदरी चंद्रहार, सोनकिरीट, बोरमाळ, कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, ११६ पुतळ्याची माळ, लप्पा, सातपदरी कंठी हे सर्व दागिने परिधान करण्यात येतात. हे दागिने तब्बल ३०० वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांची निगा आणि स्वच्छता काळजीपूर्वक करण्यात येते. देवीच्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छता करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली.