लाडक्या ठेकेदारांनी केली डोंबिवलीकरांची वाहतूककोंडी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची कामे संथ गतीने सुरू आहेत. ठेकेदाराकडून मनमानी व नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या या कामांसाठी रहदारीचे रस्ते अचानक बंद केले जातात. पालिका किंवा ठेकेदाराकडून कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याने डोंबिवलीकरांची वाहतूककोंडी होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वाहतूक पोलिसाना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी आणलेले साहित्य, अवजारे, जेसीपी, बुलडोझर, डंपर काम झाल्यावरदेखील रस्त्यावरच ठेवण्यात येतात. परिणामी नागरिकांना चालणेदेखील कठीण होते. तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत त्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव, अभियंत्यांचे नाव, संपर्क क्रमांक, कामाचा कालावधी ही सर्व माहिती नसते. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक वॉर्डनही नसतात. या सर्व बाबींकडे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बने यांचे लक्ष वेधले. यावेळी शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, उपशहरप्रमुख सुधाकर वायकुळे, संजय पाटील, राजेंद्र सावंत, विजय कदम, सौरभ गुजर आदी उपस्थित होते.

एकेरी वाहतुकीचा पर्याय
ज्या रस्त्यांवर कामे सुरू आहेत तो संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद न करता अर्ध्या रस्त्यात काम करावे व अर्धा रस्ता निदान एकेरी वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याची मागणी सदानंद थरवळ यांनी डोंबिवली वाहतूक पोलिसांकडे केली आहे.