अक्षयच्या एन्काऊंटरचे वकिलांनी केले रिक्रिएशन; पोलिसांच्या एफआयआरमधील वेळा जुळतात का?

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे ठाणे पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर या प्रकरणात नेमके किती वाजता आणि काय घडले याच्या ‘सीन’चे याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. अमित कटारनवरे यांनी रिक्रिएशन केले. अक्षयला तळोजा जेलमधून बाहेर काढल्यापासून ज्या मुंब्रा देवीच्या पायथ्याशी अक्षयचा एन्काऊंटर झाला. या मार्गावरील घटनेच्या पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या वेळा अॅड. कटारनवरे यांनी पडताळल्या. हे क्राईम सीन रिक्रिएशन घटनेतील सत्य शोधण्यासाठी आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच महाराष्ट्रासमोर येईल असा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला आधी पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, अक्षयच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर मारहाण आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस पथक त्याचा ताबा घेण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी तळोजा कारागृहात पोहोचले. त्यानंतर त्यांची व्हॅन मुंब्रादेवीच्या पायथ्याशी येताच अक्षयने बंदूक हिसकावून गोळीबार केल्यानेच त्याचे एन्काऊंटर केल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. मात्र या प्रकरणात अडकलेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिव हे भाजपचे पदाधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यासाठीच अक्षयचा एन्काऊंटर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.

दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकीलपत्र घेतलेले अॅड. अमित कटारनवरे यांनी आज तळोजा कारागृह, मुंब्रादेवी बायपास ते कळवा रुग्णालय अशा क्राईम सीनचे रिक्रिएशन केले. तळोजा जेल ते मुंब्रा बायपास खरंच तितका वेळ पोलिसांना प्रवासासाठी लागला का? मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला याची पाहणी घटनास्थळी जाऊन वकिलांच्या टीमने केली.

असे झाले क्राईम सीन रिक्रिएशन
तळोजा कारागृहातून संध्याकाळी ५:३० वाजता अमित कटारनवरे निघाले. मुंब्रा बायपास येथे घटना घडली तिथे संध्याकाळी ६.१५ वाजता ते पोहोचले. त्यानंतर कळवा रुग्णालयात ते ७.३० च्या दरम्यान पोहोचले.
घटनेच्या दिवशी खरंच इतका वेळ प्रवासाला लागला का? मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला? याची वकील अमित कटारनवरे यांनी नोंद करून घेतली.
ज्या ठिकाणी एन्काऊंटर झाले तेथील स्पॉटचे फोटो, व्हिडीओ पुरावे म्हणून त्यांनी घेतले.
मुंब्रादेवीच्या पायथ्याशी जेथे अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला त्या ठिकाणी चहा टपरीवाले आणि इतर दुकादारांनी त्या दिवशी नेमके काय पाहिले याची माहिती घेण्यात आली. ही सर्व माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे अॅड. कटारनवरे यांच्या टीमने सांगितले.