>>प्रकाश खाडे
जेजुरीचा खंडोबा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. भंडारा आणि खोबरे या दैवताला विशेष प्रिय. भाविकांकडून गडावर मुक्तहस्ते उधळण केल्या जाणाऱ्या मल्हारीच्या या भंडाऱ्याचा मात्र भेसळीने बेरंग झाला आहे. येथील विक्रेते सर्रास भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री करीत असून, या भंडाऱ्यामुळे भाविकांबरोबरच स्थानिकांच्याही आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
जेजुरीत वर्षभरात खंडोबाच्या सात ते आठ मोठ्या यात्रा भरतात. वर्षाकाठी सुमारे एक कोटी भाविक देवदर्शनासाठी जेजुरीत येतात, त्यांच्याकडून भंडारा खोबरे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. या व्यवसायातून जेजुरीत मोठी आर्थिक उलाढाल होते. खंडोबाला भंडारा वाहण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. भंडारा खोबरे देवाला वाहून गडामध्ये असणाऱ्या कासवावर भाविक भंडार खोबरे उधळतात. भंडारा-खोबरे श्रद्धेने एकमेकांना प्रसाद म्हणून वाटतात. खोबऱ्याचा प्रसाद खाताना भेसळयुक्त भंडारा त्यांच्या पोटात जातो. गडावर भंडाऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणात होत असल्याने उधळलेला भंडार भाविकांच्या डोळ्यामध्ये, तोंडामध्ये जातो. भंडाऱ्यामुळे अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, त्वचा काळी पडणे, खोकला येणे अशा गंभीर आजारांना ग्रामस्थ, भाविकांना तोंड द्यावे लागत आहे. जेजुरीतील अनेकांची कपाळे दररोज भंडारा लावल्याने काळी पडली आहेत. भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्या विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
अशी केली जाते भेसळ
चिंचुका, मक्याच्या पिठात केमिकल घालून बनावट भंडारा तयार केला जातो, या भंडाऱ्याची पोती स्वस्त मिळतात. सध्या हळदीचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक दुकानदार भेसळयुक्त भंडार विकत आहेत. याबाबत पूर्वी अनेक तक्रारी झाल्या होत्या. मात्र, अन्न औषध भेसळ प्रशासनाने हा भंडारा उधळण्यासाठी असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही असे सांगितल्याचे समजते.