मोहोळजवळ साडेपंधरा लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; कामती पोलिसांची कामगिरी

मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरून स्कॉर्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैधसाठा कामती पोलिसांनी ‘फिल्मी स्टाइल’ने पाठलाग करून पकडला. 10 लाख 50 हजार रुपयांची अवैध दारू व 5 लाख रुपयांची स्कार्पिओ असा एकूण 15 लाख 50 हजार रुपयांचा माल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने स्कॉर्पिओ दाट झाडीत सोडून पळ काढला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) टाकळी सिकंदर रोडवर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील घोडेश्वर (बेगमपूर) गावातून एक स्कॉर्पिओ जात असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारूचा अवैधसाठा आहे, अशी माहिती कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घोडेश्वर गावच्या पुढील बाजूस वडदेगाव रोडवर पोलिसांनी सापळा लावला.

दुपारी चारच्या सुमारास काळ्या काचा असलेल्या स्कॉर्पिओला रोखण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, चालकाने वाहन वडदेगावमार्गे पळविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ‘फिल्मी स्टाइल’ने स्कार्पिओचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत आल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने टाकळी सिकंदर महावितरणजवळ दाट झाडीत स्कार्पिओ लपवून तेथून पळून गेला.

पोलीस पथकाने गाडी ताब्यात घेतली असता, त्यामध्ये विदेशी बनावटीच्या दारूचे 10 लाख 50 हजार 200 रुपये किमतीचे 125 बॉक्स आढळले. तसेच स्कार्पिओ गाडी असा एकूण 15 लाख 50 हजार 200 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांनी कामती पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामतीचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, संतनाथ माने, सचिन जाधवर, अमोल नायकोडे, अनुप दळवी, दादासाहेब पवार यांनी ही कामगिरी केली.