धनगर समाजाच्या आरक्षणाचा शासनदरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे-पाटील यांनी दिल्यानंतर 11 दिवसांपासून सुरू असलेले धनगर समाजाचे राज्यव्यापी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथे राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष भाजपचे जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होते. त्यांच्यासोबत प्रल्हाद सौरमारे, बाळासाहेब कोळसे, राजेंद्र तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे, भगवान भोजने हे उपोषणाला बसले होते. सरकारने उपोषणाची दखल घेतली नसल्यामुळे दोन उपोषणकर्त्यांनी जलसमाधीचा बनाव करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल लंघे-पाटील, नितीन दिनकर, धनगर समाजाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय खेमनर, अण्णासाहेब बाचकर, अक्षय वर्पे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजेंद्र काळे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित केल्याचे अशोक कोळेकर यांनी सांगितले.