महायुती सरकारकडून सत्तेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेच्या गैरवापराला पारावार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निघोज येथे बोलताना केली. दरम्यान, उमेदवार निवडण्याची जबाबदारी आम्ही खासदार नीलेश लंके यांना दिली आहे. त्यांनी नाव उखाण्यात घ्यावे, मी लगेच ‘एबी’ फॉर्मवर सही करतो, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी निघोजमध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, माजी आमदार राहुल जगताप, राणी लंके, अर्जुन भालेकर, रा. या. औटी, ऍड. राहुल झावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, वसंत कवाद उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) शिर्डी येथे घेतलेल्या कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसचा वापर केल्याने शाळा, कॉलेजात जाणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे जिल्हाभर पाहावयास मिळाले. ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी महिना-महिनाभर दाखले रखडवण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. आतापर्यंत कधीही झाला नाही, इतका खर्च महायुती सरकारने जाहिरातींवर केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.’’
खासदार नीलेश लंके म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये निघोज येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसंवाद यात्रे’ची सुरुवात केली होती. त्या निवडणुकीत राज्यातील सत्तेत परिवर्तन झाले. या वेळीही राज्यातील सत्ता बदलणार आहे. नुकतेच लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झाले आहे. आता पारनेर, नगर मतदारसंघातही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकार औट घटकेचे!
केंद्रातील मोदी यांचे सरकार औट घटकेचे असून, येत्या पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार आणि चंद्राबाबू त्यांची साथ सोडतील. त्यानंतर केंद्रातसुद्धा विरोधी पक्षाची सत्ता येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लोकसभेला भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना जनतेने जागा दाखवून दिली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळेच शिंदे सरकार अवाच्या सवा योजना राबवून तिजोरी खाली करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.