वाढीव टप्प्याचा आदेश काढा; अन्यथा आम्हाला गोळ्या घाला, विनाअनुदानित शिक्षकांचा उद्विग्न सवाल

वाढीव टप्प्याचा जीआर काढावा, या प्रमुख मागणीसाठी कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने एक ऑगस्टपासून कोल्हापूर उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करूनही शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिक्षकांनी 11 दिवस बेमुदत आमरण उपोषण केले. शासनाने वेळकाढूपणा करू नये. गेले 59 दिवस कोल्हापूर व राज्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत, याची जाणीव शासनाला दिसत नाही. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे बैठक घेऊन आदेश काढावेत; अन्यथा आम्हा सर्व शिक्षकांना गोळ्या घालाव्यात, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.

शासनाने दि. 12 जुलै 2014 रोजी शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात जून 2024 पासून वाढीव 20 टक्के टप्पा दिला जाईल, अशी घोषणा केली. परंतु सदर घोषणेचा आदेश शासननिर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही. शासनाने पुढील टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व 15 मार्च 2024चा जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा, यासाठी 1 ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आज आंदोलनाचा 59वा दिवस आहे, जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

यावेळी शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, अनिल ल्हायकर, वैजनाथ चाटे, राजू भोरे, अरविंद पाटील, तुकाराम चव्हाण, शीतल जाधव, सचिन खोंद्रे, भानुदास गाडे, सावंता माळी, महेश सातपुते, भाग्यश्री राणे, रेखा संकपाळ, गौतमी पाटील, नेहा भुसारी, वैशाली पाटील, तेजस्विनी मगदूम, माधुरी चिकुर्डेकर इत्यादी उपस्थित होते.

न्यायासाठी दोन महिन्यांपासून हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत. वारंवार वाढीव टप्प्याची मागणी करूनदेखील राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या पाच दिवसांत शासनाने पावणेसहाशे जीआर काढलेले आहेत. मग आमचा जीआर काढायला इतका विलंब का? तत्काळ जीआर काढा; अन्यथा आम्हाला गोळ्या घाला.

– खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, विनाअनुदानित कृती समिती.