कोलकातामधील महिला डॉक्टरची निर्घृण हत्या- आरोपी संदीप घोषला मृत्युदंडाची शिक्षा अटळ, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण; जामीन फेटाळला

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यातील आरोपी संदीप घोषवरील आरोप गंभीर आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते, असे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायालयाने नोंदवले आहे.

या घटनेतील पुराव्यांशी छेडछाड व रुग्णालयात आर्थिक फेरफार केल्याचा घोषवर आरोप आहे. सीबीआयने घोषला अटक केली. घोषने जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष सीबीआय न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. घोषने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे, असा दावा न्यायालयात करण्यात आला.

सीबीआयने या जामिनाला विरोध केला. घोषवरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्याला जामीन मंजूर केल्यास समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, असे नमूद करत विशेष न्यायालयाने घोषचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

देशात संतापाची लाट

ही घटना 9 ऑगस्ट 2024 रोजी उघडकीस आली. सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. याचा तपास सीबीआय करत आहे.