कालच्या निकालाने स्पष्ट, रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांचे केले अभिनंदन

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दणदणीत विजय झाला. ही निवडणूक पुढे का ढकलली जात होती याचे उत्तर या विजयाने मिळाले असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले.

रोहित पवार म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक वारंवार पुढे का ढकलली जात होती, याचं उत्तर कालच्या निकालाने स्पष्ट केलं आहे. मुंबई सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आदित्य ठाकरे तसेच सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन.

सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष आहे आणि त्या भीतीतूनच विधानसभा निवडणूक देखील एक महिना पुढे ढकलण्यात आली. तसंच मुंबई मनपाससह राज्यातील सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत. असो या निवडणुकांमध्ये देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल हा विश्वास आहे असेही रोहित पवार म्हणाले.