एअर इंडियाच्या दिल्ली-न्यूयॉर्क विमानात प्रवाशाला दिलेल्या ऑमलेटमध्ये चक्क झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महिला प्रवाशाने सोशल मीडियावरून तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर DGCA आणि नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांना टॅग करत व्हिडिओ आणि फोटो शेअर केला.
सुयेशा सावंत ही महिला 17 सप्टेंबर रोजी दिल्लीहून-न्यूयॉर्कसाठी एअर इंडियाच्या विमानाने रवाना झाली. प्रवासादरम्यान महिलेने ऑमलेट ऑर्डर केले. या ऑमलेटमध्ये महिलेला झुरळ आढळले. मात्र तोपर्यंत महिलेने आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलाने ऑमलेटचा बराचसा भाग खाल्ला होता. यामुळे आपल्याला अन्नातून विषबाधा झाल्याचा दावा महिलेने केला आहे.
यानंतर महिलेने सोशल मीडियावर अकाऊंटवरून याबाबत तक्रार नोंद केली. एअर इंडियाने महिलेच्या तक्रारीची नोंद घेत सदर प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. तसेच बुकिंग तपशील DM द्वारे शेअर करा जेणेकरून आम्ही त्वरित तपास करू, असे म्हटले आहे.
एअर इंडियाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आधीच याबाबत तपास सुरू केला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू, असे एअरलाईनच्या प्रवक्त्याने सांगितले.