>> सुरेश चव्हाण
सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा वारसा असलेल्या रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगावात डॉ. राजा दांडेकर व प्राध्यापिका असलेल्या रेणू दांडेकर या जोडप्याने शासकीय अभ्यासक्रमासह रोजगार निर्मितीचे पायाभूत शिक्षण देणारी शाळा सुरू केली.
रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. दापोली तालुक्यात तीन महापुरुष होऊन गेले. ज्यांना भारतरत्न ही उपाधी मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे व पा. वा. काणे. आणि साने गुरुजीही याच तालुक्यातले. अशा या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत काम करणाऱया व्यक्ती ज्या भूमीत जन्माला आल्या, त्याच दापोली तालुक्यात डॉ. राजा दांडेकर यांचा जन्म झाला. घरची गरिबी व घरात खाणारी तोंडं जास्त असल्यामुळे व शेती हेच उत्पन्नाचं साधन असल्यामुळे सुरुवातीचं शिक्षण राजाभाऊंनी माधुकरी मागून पूर्ण केले.
मॅट्रिक झाल्यावर त्यांच्या परिचयाचे असलेले अनंतराव देवकुळे यांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात बोलावले. त्या वेळेस त्यांच्या वडिलांनी 200 रुपये त्यांच्या हातात दिले व त्यांना सांगितले, “तुला जे करायचं आहे ते कर.’’ राजाभाऊंनी ठरवलं होतं शिकून डॉक्टर होऊन परत आपल्या गावी यायचं. जवळपास संपूर्ण हिंदुस्थानभर त्यांनी भ्रमंती केली आहे. गो. नी. दांडेकरांसोबत अनेक गडकोट, किल्लेही ते भटकले.
डॉक्टर होऊन राजाभाऊ आपल्या चिखल गावात परतले ते त्यांच्या पत्नी रेणू दांडेकर यांच्या समवेत. लग्नापूर्वीच्या त्या प्रतिमा केसकर. बी.ए., एम.ए.ला विद्यापीठात पहिल्या आलेल्या व प्राध्यापक असलेल्या रेणूताईंनी आपला संसार गुरांच्या गोठय़ात सुरू केला. गावातील सहा मुलांना घेऊन त्यांनी शाळा सुरू केली. राजाभाऊंचा फिरता दवाखाना चालू होता. ते आजूबाजूच्या गावात जाऊन गरजूंना औषधोपचार करायचे. जेवढे पैसे देतील, तेवढे घेऊन त्यांच्या घरातील घोंगडीवर किंवा जमिनीवर बसून आजारी व्यक्ती तपासत होते. एकीकडे त्यांचं हे काम चालू होतं, तर दुसरीकडे रेणूताई शाळा चालवत होत्या. सुरुवातीला त्याच शिक्षिका होत्या. त्या पालक-पाल्य संबंधातील जाणकार व उत्तम शिक्षिका आहेत, शिक्षणतज्ञ आहेत आणि या विषयांसंबंधी त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
महाविद्यालयात असताना राजाभाऊंनी महाराष्ट्रातले व देशातले अनेक चांगले प्रकल्प पाहिले. याच काळात त्यांनी ग्रामीण भागही पाहिला. तेव्हा त्यांच्या वाचनात ‘जगाची शेती’ नावाचं एक पुस्तक आलं. फिलिपाईन्सचे ग्राम पुनर्रचनेचे प्रणेते डॉक्टर जेम्स इन यांनी या पुस्तकात पाच सूत्रे सांगितली आहेत. ती सूत्रे अशी, तुम्हाला ग्रामीण भागात काम करायचं तर लोकांच्यात जा, लोकांच्यात राहा, लोकांकडून शिका. तुम्हाला काय येतं हे विसरून जा आणि लोकांच्या गरजांनुसार काम करा. लोकांमध्ये जात असताना त्यांच्यासारखे राहा.
सुरुवातीच्या काळात त्यांनी आंध्र, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू या राज्यांत काही प्रयोगक्षम शाळा पाहिल्या. हे सगळे बघून ते विचार करू लागले, आपल्याकडे कशा पद्धतीची शिक्षण पद्धती पाहिजे? त्यांना सध्या ज्या प्रचलित पद्धतीने शाळा चालवल्या जातात, त्या पद्धतीने शाळा चालवण्यात अजिबात रस नव्हता. समाजाच्या चौकटीत राहून नावीन्यपूर्ण काही देता येतं का याच विचारधारेतून गेली तीस वर्षे ते, त्यांच्या पत्नी व त्यांचे सहकारी शाळा चालवत आहेत. आता कॉलेजही सुरू झालं आहे. शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. ‘प्रॉडक्टिव शिक्षण’ असलं पाहिजे. ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगतात, “नोकर बनायची स्वप्नं बघू नका. मालक बनायची स्वप्नं बघा.’’
दांडेकरांच्या शाळेत मुलगा-मुलगी असा भेद नाही. मुलीसुद्धा वेल्डिंग व सुतारकाम करतात, तर मुलं जेवण, केटरिंग, बेकरी उद्योग चालवतात. त्यातून त्यांना पैसे कमवता येतात. शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून त्यासोबतच मुलींसाठी नर्सिंग, ड्रेस मेकिंग,
फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर असे कोर्स त्यांनी सुरू केले आहेत. प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल याचा विचार ते करत असतात. “आमच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट मुलं सुरू करतात व तेच चालवतात. त्याबाबतचे निर्णयही तेच घेतात. म्हणजे काम त्यांनी करायचे आणि निर्णय मी घ्यायचा, असं आमच्याकडे नाही. याने कामाला आकार येतो आणि ताकद मिळते. आमची सगळी मुलं मला हे सर्व सांभाळताना दिसत आहेत. माझ्या पश्चातही ती सगळं नक्की सांभाळतील, असा विश्वास मला वाटतो. नाहीतर माणसं जातात, त्यांच्याबरोबर सुरू केलेली कामंही संपून जातात, असं आमच्या इथे होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे.’’
एकेदिवशी राजाभाऊंनी आपला चांगला चाललेला वैद्यकीय व्यवसाय पूर्णपणे सोडून दिला. बारा वर्षे केलेली प्रॅक्टिस एका दिवसात बंद केली. दापोलीत त्यांनी 32 गावांमध्ये ग्राम आरोग्य सेविका तयार केल्या आणि प्रत्येक गावात एक नर्सिंग किट दिलं. त्यांनी आपल्या पत्नीला त्या प्राध्यापिका असताना बी.एड. करायला सांगितलं. कारण घरात शाळा काढायची तर त्यासाठी फुकट शिक्षक हवा. बी.एड. झाल्यावर गावाकडे जायचं ठरलं तर त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. गोठय़ात शाळा, दवाखाना व संसार सुरू झाला. रेणूताई खेडय़ात कधी राहिल्या नव्हत्या. चुलीवरचा स्वयंपाकही त्यांना येत नव्हता. पण हे सगळं त्या शिकल्या. आज त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेत शिकून मोठय़ा हुद्दय़ांवर आहेत. काहींनी गावातच उद्योगधंदे सुरू केले आहेत. त्याचबरोबर ते आपली शेतीही करतात.
राजाभाऊंनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना कधी शिकवलं नाही. त्यांनी मुलांशी दोस्ती केली. त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्याशी गप्पा मारल्या. तेव्हा विद्यार्थी मोकळे व्हायचे व त्यातूनच त्यांना असं समजलं की, जे काही करायचं ते प्रत्यक्ष कृतीतून करायचं. माझ्याकडे मुलांना देण्याकरिता कोणती कला आहे ज्यायोगे मी मुलांना जवळ करू शकतो, त्यांची गरज भागेल असं काय शिकवू शकतो. मी ज्या गावात जाईन, त्या गावची गरज काय आहे व माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काय आहे, हे समजायला हवं. चाकोरीत राहून चाकोरी बाहेरचं शिक्षण देता येतं. शासनमान्य तेच करायचं. आपल्याला ‘ग्राम विकास’ करायचा आहे तर तो शिक्षणाच्या माध्यमातून करायचा, असा त्यांचा ठाम निर्धार आहे. उमलत्या वयापासूनच मुलांना ग्रामीण पुनर्रचनेचे धडे दिल्यामुळेच आज त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी शिकून मोठय़ा पदांवर पोहोचले आहेत. पूर्वी याच गावातील गावकऱयांचा मुलांना शाळेत पाठवायला विरोध होता. मुलींनी शिकू नये अशी गावकऱयांची धारणा होती. परंतु गेल्या 30 वर्षांत राजाभाऊ व रेणुताई दांडेकरांनी ही परिस्थिती बदलली व आज एक ‘आदर्श शाळा व आदर्श शिक्षण पद्धती’ त्यांनी चिखल गावातील शाळेद्वारे नावारूपाला आणली आहे.