>> अनिल हर्डीकर
सिग्नलशी गाडी थांबली की खिडकीच्या काचा, बोनेट साफ करणाऱयांपैकी एक रशीद. हा चुणचुणीत रशीद हंगलजींची गाडी थांबली की कुणा ना कुणा अभिनेत्याची नक्कल करून दाखवे. त्याला चित्रपटात काम करायचे होते… आणि एक दिवस हंगलजींनी त्याची इच्छा पूर्ण करायचे ठरवले. पण ती भेट घडलीच नाही. ही न घडलेली भेट ए.के. हंगल यांना अखेरपर्यंत रुखरुख देत राहिली.
हिंदी चित्रपटाची आवड असणाऱया एखाद्या रसिकालादेखील अवतार कृष्ण हंगल असं नाव घेतल्यावर पटकन हा कलाकार लक्षात येणार नाही, कारण तो सर्वांना ठाऊक होता ए.के. हंगल म्हणून. गंमत म्हणजे हंगलजींना कधीच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा नव्हती. इप्टा या कम्युनिस्ट विचारसरणीच्या नाटय़ संस्थेत प्रायोगिक रंगभूमीवरच्या कामात ते समाधानी होते. पण काही घटनांमुळे, काही विशिष्ट परिस्थितीमुळे ते चित्रपट जगतात ओढले गेले. 1962 साली इप्टाच्या भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये तालमी चालू असताना ‘तिसरी कसम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य तिथे आले आणि त्यांनी ‘तिसरी कसम’ या चित्रपटात छोटीशी भूमिका कराल का, अशी विचारणा केली व हंगल ‘करतो’ म्हणाले आणि कोणताही गाजावाजा न करता हंगलजी चित्रपट क्षेत्रात प्रवेश करते झाले. त्या वेळी ते 40 वर्षांचे होते. रंगभूमीवरील एक सक्षम कलाकार म्हणून त्यांचं नाव झालेलं होतं.
इप्टा ही त्या काळातील शहरातील महत्त्वाची प्रायोगिक नाटय़ संस्था होती. अव्यावसायिक नाटकांनादेखील प्रेक्षक वर्ग असतो हे या संस्थेने त्यांच्या भरीव कार्याने सिद्ध केलेलं होतं. सुलभा आर्य, रमेश तलवार, जावेद खान, भरत कपूर, रमण कुमार, राकेश बेदी, अंजन श्रीवास्तव, सुधीर पांडे, रिबारानी पांडे, अखिलेंद्र मिसहरा, मुश्ताक खान, अरुण बक्षी, जसपाल संधू, अमृत पाल, राजेंद्र मेहरा, सुदेश बेरी, नेहा शरद, सुभाष दांग्याच, प्रभा मिश्रा, सुरेंद्र गुप्ता, तरुण मोहम्मद, कुलदीप सिंह, मुरलीधर किती नावं घ्यावी? एम.एस. सथ्यू, कैफी आझमी, शबाना आझमी, जावेद अख्तर अशीही मोठी माणसं या इप्टाशी संबंधित होती.
…तर इप्टातला ए.के. हंगल नावाचा कलाकार चित्रपट सृष्टीत खूप मोठा झाला. त्याने अनेक नाटकांतून लक्षात राहतील अशा भूमिका केल्याच होत्या. त्यातील काही महत्त्वाची नाटके होती इनामदार, सुरज, गुडिया घर, आखरी शमा… एवढेच नव्हे तर काही नाटके स्वत लिहून दिग्दर्शितदेखील केली होती. अशाच एका ‘डमरू’ नावाच्या नाटकात प्रमुख भूमिका संजीव कुमार म्हणून आपल्याला परिचित असलेल्या त्या वेळच्या हरी जरीवालाला दिली होती. फक्त त्याला त्या वेळी म्हातारा करायला आवडत नसे. त्याने तसे हंगलजींना बोलून दाखवले, हंगलजी त्याला म्हणत, “आत्तापासूनच तुला हीरोच्या भूमिका दिल्या तर तू हीरोच राहशील. अभिनेता कधीच होणार नाहीस.’’ याच संजीव कुमारबरोबर हंगलजी अनामिका, आँधी, परिचय, शोले, खुद्दार अशा चित्रपटांतून पाहायला मिळाले. 200हून अधिक चित्रपटांतून त्यांनी छोटय़ा पण लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. आयना, बावर्ची, शौकीन, चितचोर, गर्म हवा, अवतार, अनुभव, तपस्या, गुड्डी, नमकहराम, प्रेम बंधन अशा अनेक चित्रपटांतून. ज्या वेळी ए.के. हंगल हे नाव चित्रपट रसिकांना परिचयाचं झालं त्या वेळी चित्रीकरणासाठी ते अनेकदा माहीम कॉजवेवरून गाडीने जात असत.
सिग्नलशी गाडी थांबली की बरीच छोटी मुलं गाडीपाशी धावत येतात. आतल्या लोकांच्या नकाराला, विरोधाला न जुमानता शक्य तेवढय़ा खिडकीच्या काचा, बोनेट साफ करतात आणि पैशासाठी हात पुढे करतात. अशा त्या मुलांच्या घोळक्यातल्या एका पोराने हंगलजींना ओळखलं आणि त्याने पैशासाठी पुढे केलेला हात मागे घेतला. त्या मुलाचं नाव होतं रशीद. हा मुलगा चुणचुणीत होता. तो हंगलजींची गाडी थांबली की हंगलजींना कुणा ना कुणा नटाची नक्कल करून दाखवे आणि म्हणे, “मला काम द्या ना चित्रपटात.’’ हंगलजीना त्याची दया येई. चित्रपटसृष्टीत शिरायची संधी शोधणारे खूप तरुण-तरुणी असतात. हाही त्यापैकीच एक. हंगलजींना वाटलं त्याला एखाद्या गर्दीच्या दृश्यात जरी कॅमेऱयाच्या समोर उभं रहायची संधी मिळाली तरी त्याला पुरेसं आहे. एखाद्या गर्दीच्या दृश्यात त्याला संधी देणं हंगलजींना कठीण नव्हतं. एक दिवस ते रशीदला म्हणाले, “उद्या याच वेळी तयार रहा, मी तुला शूटिंगला घेऊन जाईन.’’ रशीदच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो म्हणाला, “मी उद्या नवीन कपडे घालून उभा राहतो, वाट बघतो. या नक्की!’’
दुसऱया दिवशी तो सिग्नलजवळ दिसला नाही. असेच तीन चार दिवस गेले. एक दिवस सिग्नलला गाडी थांबल्यावर हंगलजींनी एका पोराला विचारलं, “रशीद कहाँ है?’’
“कौन रशीद?’’
“रशीद नहीं मालूम?’’
“वो जो हीरो का मिमिक्री करता था?’’
“हां, वोही…’’
“वो तो मर गया. गाडी के नीचे आके, हफ्ता हो गया.’’
फार महत्त्वाची नसल्यासारखी ती बातमी त्याने सांगितली आणि हंगलजी अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यासमोर नवीनकोरे कपडे घातलेला, उद्याची स्वप्नपूर्तीची स्वप्नं पाहणारा रशीद आला. भेट ठरली होती पण… नियतीच्या मनात नव्हतं…